शिर्डीहून साईंचं दर्शन घेऊन परतताना दोन कारची जोरदार धडक; चौघांचा जागीच करुण अंत

Foto
 नाशिक : नाशिक जिल्ह्यातील आंबेगन शिवारात राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, या अपघातात सहा ते सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकहून पेठच्या दिशेने जाणारी कार आणि विरुद्ध दिशेने येणार्‍या दुसर्‍या कारमध्ये ही धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. मृत प्रवाशांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.

जखमींवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी चार महिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील समोर येत आहे. शिर्डी येथे दर्शन घेऊन नाशिकमार्गे गुजरातमधील वापीकडे जात असताना चाचडगाव टोलनाका ओलांडल्यानंतर हा अपघात झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.